शेतकऱ्यांनो, वीज बील भरायला शिका: अजित पवार

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला आहे. आता आकडे टाकणे बंद करा आणि वीज बिल भरायला शिका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले.

कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे राज्य सरकारतर्फे आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानासाठी पवार आले होते. सरकारी योजनांच्या शिबिरातील पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री पवार, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते.
‘महाराष्ट्रत मी जिकडे जातो, तिकडे आकडे पाहायला मिळतात. आकडे टाकून चोरीची वीज घेणे चांगले नाही. वीज वितरण कंपनी अडचणीत आली आहे. थकबाकी वाढत आहे. कर्जही वाढत आहे. दुसरीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता वीज बिले भरण्यास शिकले पाहिजे. आम्ही फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो. कर्जत-जामखेड मतदारसंघातून तुम्ही रोहित पवार यांना निवडून दिले आहे. आता तुमची जबाबदारी संपली, आमची सुरू झाली आहे. येथील पोलीस आणि प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न राहाता काम करावे. चांगले काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल,’ असा इशारा त्यांनी दिला.

महिला सुरक्षा कायदा आणि सीएए संबंधी पवार म्हणाले, ‘राज्यात महिलांच्या सुरेक्षेसाठी कडक कायदा आणत आहोत. त्यामुळे यापुढे मुलींकडे वाकड्या नजरने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. यावर देशपातळीवर एकमत होणे आवश्यक आहे. सीएए, एनआरसीचा महाराष्ट्रात कोणालाही, कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही, याची खात्री आमचे सरकार देत आहे.’